मुंबई – यवतमाळच्या जंगलातील अवनी वाघिणीच्या हत्येवरुन राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला फटकारले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात एका बाजूला २०१८ मध्ये अवनी वाघिणीचा मृत्यू झाल्याचे दाखवले आहे, तर दुसऱ्या बाजूला २०१९ लिहिले आहे, तिथे महाराष्ट्राला वाघाच्या रुपात दाखवून हा वाघ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडला असल्याचे दाखवले आहे.
राज्यात सध्या
अवनी वाघिणीच्या हत्येचा मुद्दा गाजत असून, पर्यावरणप्रेमी आणि प्राणीमित्र यांच्या बरोबरच काँग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी अवनी वाघिणीची हत्या करणे चुकीचे असल्याचे सांगत
भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आरोप
केला आहे, की अंबानीच्या कंपनीला जमीन
दिल्यानंतर त्यांना या वाघिणीचा त्रास होऊ नये यासाठीच अवनीचा बळी घेतला आहे.
मनसे प्रमुख राज
ठाकरे यांनीही अवनीला जिवंत पकडता येत नव्हते तर बेशुद्ध करणे योग्य राहिले असते
असे म्हटले होते. मात्र या सरकारला माज चढला आहे, आपण काहीही केले तरी आपल्याला
कोणी काहीही म्हणू शकत नाही, असे त्यांना वाटत आहे. त्यांचा हा माज २०१९ मध्ये
जनता उतरवेल असे राज यांनी म्हटले होते. आता त्यांनी आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून राज्य
सरकारला चढलेला माज जनता कसा उतरवेल हे व्यंगचित्रातून दाखवले आहे.
राज यांनी शेअर
केलेल्या एका व्यंगचित्रात त्यांनी एका बाजूला अवनी वाघिण मृत अवस्थेत दाखवली असून
त्यावर २०१८ असे लिहले आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राला वाघाच्या रुपात
दाखवून हा वाघ
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिकार करत असल्याचे
दाखवण्यात आले आहे. व्यंगचित्राच्या दुसऱ्या बाजूला २०१९ असे लिहले आहे. याचाच
अर्थ येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता युती सरकारचा फडशा पाडणार असेच या
व्यंगचित्रातून राज यांना सुचवायचे आहे.
राज यांनी
नुकतेच दिवाळीच्या निमित्ताने राजकीय व्यंगचित्रांची मालिका प्रसिद्ध केली होती.
यातही त्यांच्या निशाण्यावर पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री
फडणवीस होते. या व्यंगचित्रांवर प्रतिक्रिया देण्याचे भाजपने आद्यापपर्यंत टाळले
आहे.
















